लाच घेताना उपलेखापरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

विकास सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाकडून 8 हजार 500 रुपये लाच स्वीकारताना सहकारी संस्था केडगाव येथील उपलेखापरिक्षक यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. रविंद्र ज्ञानेश्वर गाडे (वय-51) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपलेखापरिक्षकाचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (दि.9) सासवड तहसिलदार कचेरीच्या कार्यालयासमोर केली.
तक्रारदार हे विकास सेवा सहकारी सोसायटी लि. दौंड येथे सचिव म्हणून नोकरी करतात. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज देणे व कर्जाची वसुली करण्याची कामे केली जातात. शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली 50 टक्क्यापेक्षा जास्त असेल तर शासनाकडून (सहकार खाते) संस्थेला अनुदान दिले जाते. त्यासाठी तालुका ऑडीटरकडून लेखापरिक्षण करणे आवश्यक असते.
तक्रारदार यांनी लेखापरिक्षण करण्याचा प्रस्ताव रविंद्र गाडे यांच्याकडे दिला होता. गाडे यांनी तक्रारदार यांच्या संस्थेचा सन 2020-21 व सन 2021-22 या दोन वर्षांचे सक्षमीकरणाच्या प्रस्तावरील शिफारसीकरीता 10 हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची 6 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता रविंद्र गाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून गाडे याला तक्रारदार यांच्याकडून 8 हजार 500 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. रविंद्र गाडे याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.