महाराष्ट्राने ओलांडला मोठा टप्पा; 1 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण

मुंबई प्रतिनिधी :
देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यासह देशात १६ जानेवारीला प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. को-विन अॅपमधील तांत्रिक गोंधळ वगळता लसीकरणामध्ये आतापर्यंत फारशी अडचण नाही. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं गेले दोन दिवस लसीकरण बंद पडल्यानं गोंधळ उडाला होता. मात्र, त्यावरही राज्यानं मात केली असून लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
आतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.