कुकुडवाडीच्या कलाकाराची हस्तकला ठरतेय लक्षवेधी : लाकडाला आकार देत साकारल्या अनेक मुर्त्या अन वस्तू

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कोणतेही पदवी शिक्षण अथवा कला शिक्षण नाही किंवा उपजत कारागीर देखील नाही तरी सुद्धा सत्तरीतील एका वयोवृद्धाने आपल्या बुद्धीचातुर्याने व कल्पकतेने मिळणाऱ्या टाकाऊ लाकडापासून टिकाऊ कलेला जन्म दिला आहे.त्यांनी हा छंद लहानपणापासून जोपासला आहे. वस्तू तयार करण्यासाठी कोणत्याहि यांत्रिक साधनांचा वापर न करता आपल्या हस्तकलेने अनेक दैवी मुर्त्या अगर विविध वस्तू तयार केल्या आहेत.यासाठी खूप परिश्रम घेतले आहे.अशा कलाकाराच्या कलेला जर मदतीचा हात मिळाला तर ही कला आणखीन चित्रीत होईल व हातभार लागेल असा हरहुन्नरी कलाकार तालुक्यासाठी आदर्शवत असाच आहे.
कुकुडवाडी (ता.राधानगरी) या छोटयाशा गावात बळवंत विष्णू डवरी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्य करतात.साधी सरळ राहणी हे त्यांच्या जीवनाचे सार आहे. हालअपेष्टा सहन करत त्यांनी जीवन जगले आहे.त्यांच्या जीवनाला शिक्षणाचा कोणताही गंध अगर वास नाही लहानपनापासून त्यांना मातीच्या वस्तू बनविण्याचा छंद जडला आणि या छंदातूनच त्यांच्या हस्त कलेचा जन्म झाल्याचे हस्तकलाकार डवरी सांगतात. त्यांनी लाकडावर आजपर्यंत अनेक मुर्त्या आणि विविध वस्तू कोरल्या आहेत.विशेषतः या वस्तू कोणत्याही आधुनिक यंत्र सामुग्रीचा आधार न घेता कोयता आणि साधे किकरे यांच्या साहाय्याने बनविल्या आहेत.विशेष म्हणजे शेतातील टाकाऊ लाकडाचा वापर करत टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत.यासाठी मऊ लाकडाचा वापर केला आहे.त्यांनी कलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही.टीव्हीवरील अथवा अनेक भिंतीवरील अथवा पुस्तकातील चित्रे पहात त्यानी अनेक मुर्त्या व वस्तू हुबेहूब हस्तकलेने साकारल्या आहेत.व त्यावर मनमोहक रंगकाम केले आहे.तयार केलेल्या वस्तू आणि मूर्त्यामध्ये लक्ष्मीमाता,विठ्ठल, खंडोबा,रेणुकामाता, श्रीकृष्ण,सरस्वती,श्री गणेश,छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,राजांचे मावळे,आदी तर,डमरू,ट्रक,रथाचे घोडे,बैलजोडी,आदी कलाविष्काराला जन्म दिला आहे.वयाच्या ७० व्या वर्षी सुद्धा हा कलेचा छंद जोपासून कला जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजही धक्काधकीच्या जीवनात या कलाकाराने टिकवून ठेवला आहे.अशा कलाकाराचे हात बळकट करण्यासाठी मदतीची गरज आहे.

मी उपजत कारागिर नसून भिंतीवरील चित्रे,टीव्ही,पुस्तके यांच्यातील ज्ञानाच्या आधारे कोरिव कला आत्मसात केली आहे. अगदी लहानपणापासून मला लागलेला हा कलेचा छंद वार्धक्यातही जोपासला आहे.आणि भविष्यातही जोपासला जाणार आहे.कोणतीही आधुनिक यंत्रसामुग्री माझ्याकडे नाही तरी सुद्धा कोयता आणि किकरे या दोन साधनांच्या साहाय्याने कला साकारत आहे.भविष्यात हे हात कलेने आणखीन बळकट करण्यासाठी मदतीची गरज असल्याचे मत त्यांनी दैनिक महाभारत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले
कलाकार
बळवंत विष्णू डवरी
कुकुडवाडी ता. राधानगरी