बिद्रीत आजपासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन , वाढत्या रुग्णसंख्येने ग्रामदक्षता समितीचा निर्णय

बिद्री ( प्रतिनिधी ) :
बिद्री ( ता. कागल ) गावातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन ग्रामस्तरीय दक्षता समितीने कोरोना प्रतिबंधासाठी गावात सहा दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरुवार दि. १७ ते मंगळवार दि. २२ जूनअखेर हा लॉकडाऊन गावात लागू करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. आनंदी हिंदूराव पाटील व दक्षता समिती सदस्यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून बिद्री गाव आणि मौनीनगर कारखाना साईट या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत.बिद्री कारखाना साईट, ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी खरेदीसाठी सातत्याने गर्दी होत आहे. यामुळे परिसरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. वाढता प्रसार रोखण्यासाठी गावात लॉकडाऊन घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती.
वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन ग्रामस्तरीय दक्षता समितीने गावात सहा दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवार ते मंगळवार सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात दुकाने उघडणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड आणि दुकान सील करण्यात येणार आहे तर विनामास्क फिरणाऱ्यांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. सर्व व्यावसायिकांनी या काळात आपले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन, ग्रामस्तरीय दक्षता समितीने केले आहे.