कोल्हापूर: दारू पिऊन रस्त्यावर दोन पोलीसांचा धिंगाणा

कोल्हापूर प्रतिनिधी :
येथील कसबा बावड्यातील शंभर फुटी रस्त्यावर दारूच्या नशेत दंगामस्ती करणाऱ्या दोन पोलिसांना शहर उप अधीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेतले. महामार्ग पोलिस पथकातील बळवंत शामराव पाटील (वय ५१, रा. पोलिस मुख्यालय), राजकुमार शंकर साळुंखे (वय ५३, रा. बेडेकर प्लाझा कसबा बावडा) या दोघांसह जितेंद्र अशोक देसाई (वय ३६ रा. कासारवाडा) या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व त्यांचे पथक शनिवारी रात्री गस्तीला कसबा बावड्यात जात होते. शंभर फुटी रोडवर मद्यपींचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. तत्काळ त्यांनी घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतले त्यांच्यापैकी दोघे हे पोलिस खात्यातच कार्यरत असून ते महामार्ग पोलिसांत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दारूबंदी अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली
तिघा मद्यपींना ताब्यात घेताना त्यांनी पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना धक्काबुक्की केल्याचे बोलले जात होते. जीपमध्ये बसवताना मद्यपींना विरोध केला. त्यांनी कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला धक्काबुक्की झालेली नाही, असे उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.