कागल तालुक्यातील कुरुकली येथे पाच जनावरांचा अचानक दुर्दैवी मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुरुकली (ता. कागल) येथील पाच जनावरांचा अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन दुभत्या म्हशी आणि दोन रेडकांचाही समावेश आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील जवळपास २० जनावरे सध्या आजारी आहेत. यातील चार ते पाच म्हशी अत्यवस्थ आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, पशुखाद्य खायला दिल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा संशय जनावर मालकांचा असून दूध संघ प्रशासनाने मात्र हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुरुकली (ता. कागल) येथील अमोल दत्तात्रय रंगराव पाटील, कुंडलिक दादू कांबळे, अमित बंडा कांबळे या तीन शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशी तर गुलाब दत्तू तिराळे व विलास हरी पाटील यांच्या दोन रेडकांचा अशा पाच जनावरांचा दोन दिवसांत अचानक मृत्यू झाला आहे. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना पशुखाद्य खायला
घातले आहे. त्यावेळेपासून या जनावरांनी चारा खाणे सोडून दिले होते. त्यानंतर काही तासांतच त्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.