केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापुर जिल्ह्याच्यावतीने बिंदू चौक येथे तीव्र निदर्शने.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
केंद्रीय मंत्री मा.श्री.नारायण राणे यांच्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे भाजपा कोल्हापूर महानगर जिल्ह्याच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. आघाडी सरकार विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकावर दहशत माजविणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीच्या आघाडी सरकारचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. सोशल मीडिया वर सरकारची खरडपट्टी काढणारे सामान्य नागरिक असोत की राजकीय कार्यकर्ते, या सर्वांवर दडपशाही केली जात आहे. केंद्रीय मंत्री असताना आणि केवळ वादग्रस्त वक्तव्य केले इतकाच गुन्हा असताना ज्या प्रकारे यंत्रणा वापरून आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवून नारायण राणेंना अटक झाली त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे.
एका बाजूला सरकारमधील एक एक मंत्र्यांचे अब्जावधींचे गैरव्यवहार बाहेर येत असताना, त्यातील काहींच्या बेकायदेशीर मालमत्ता जप्त होत असताना आणि काहींवर हातोडा पडत असताना सरकार ने संयमाने काम करावयाचे सोडून सरकार सूडबुद्धीने आणि आकसाने वागत आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातल्या तिघाडी सरकार मधील धुरंधरांचा सेनेला पुढे करून भाजपा सेना तेढ वाढविण्याचा आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे सेनेला उकसवून त्यांच्याकडून चुका घडवत आहेत असे चित्र दिसते. गेल्या काही दिवसात सेनेच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहीणाऱ्या राजकीय करीकर्त्यांवरच नव्हें तर सामान्य नागरिकांवरही हल्ले झालेले महाराष्ट्राने पाहिले. कालच कोल्हापूरातील एका सामान्य तरुणाच्या घरी जाऊन घरातील महिलांसमक्ष त्याला मारहाण करण्यात आली. करण होते त्याने एका सामाजिक माध्यमांवर केलेली सरकार विरोधी पोस्ट. समाजमाध्यमांवर या मारहाणीचा व्हीडिओ शहरातील अनेकांनी पाहिला तसाच पोलीस यंत्रणेनेही पाहिला असणार, पण आज त्यातील एकही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. आणि आज दिवसभर ठिकठिकाणी शिवसैनिकांनी केलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन करणे ही तर पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिकाच आहे. राणे जे बोलले त्याला भाजपा चे समर्थन नाहीच हे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे , पण शरजिल उस्मानी सारख्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला हात न लावणारे सरकार ज्या पद्धतीने जेवणाच्या तटावरून उचलून एका केंद्रीय मंत्र्याला अटक करते त्यावेळी त्यांच्या सुडबुद्धीचाच प्रत्यय येतो.
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराना पूर्णपणे तिलांजली देऊन केवळ स्वार्थासाठी चालवलेल्या या सरकारकडून आणखी कोणती अपेक्षा करायची ? पण जो पक्ष सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी झुंडशाही करायचा तो पक्ष आज आपले स्वार्थ टिकविण्यासाठी आणि विरोधी मत मांडणाऱ्यांवर दहशत बसावी म्हणून जे करत आहे ते निंद्य तर आहेच पण सेनेला अशोभनीयही आहे. आगामी निवडणुकीत जनता त्यांना त्यांच्या या कृत्याची योग्य पावती देईल हे नक्कीच. सत्ताधारी पक्ष म्हणून सेनेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान होते आहे. आता हे थांबविणे जनतेच्याच हातात आहे.यावेळी सेनेच्या तालिबानी वृत्तीचा निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाअध्यक्ष राहुल चिक्कोडे,अशोक देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर, राजु मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.