40 हजार रुपये लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लोहगड गावात सोलर प्रकल्प राबविण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्याकडून 40 हजार रुपये लाच स्वीकारताना वडगाव मावळ पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अंकुश किसन खांडेकर (वय -57) असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई वडगाव मावळ पंचायती समिती कार्यालयात गुरुवारी (दि.5) केली.
याबाबत 20 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे जागृती एंटरप्राइजेसमध्ये साईट मॅनेजर म्हणून काम करतात. जागृती एंटरप्राइजेस कंपनीला बारा व्हॅट सोलर स्ट्रीट लाईट वर्क ऑर्डर चे काम लोहगड येथे चालू करायचे होते. त्यासंदर्भात ग्रामपंचायत लोहगड अंतर्गत शुल्क अनुदानातून 1 लाख 44 हजार 320 रुपये व 18 टक्के जीएसटी अशी निविदा जागृती एंटरप्राइजेसच्या नावाने मंजूर झाली होती. या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी विस्तारस अधिकारी अंकुश खांडेकर याने तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
प्राप्त तक्रारीनुसार पुणे एसीबीच्या पथकाने 15,16 आणि18 सप्टेंबर रोजी पडताळणी केली. त्यावेळी मंजूर झालेल्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी अंकुश खांडेकर याने 40 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी वडगाव मावळ पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 40 हजार रुपये लाच घेताना अंकुश खांडेकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. खांडेकर याच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विदुलता चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक ढवणे,
पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस शिपाई दिनेश माने, चालक पोलीस शिपाई माळी यांच्या पथकाने केली