KOLHAPUR 7/12 : कोल्हापुरातील आणखी सहा हजार सात-बारा होणार बंद.

कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील आणखी सहा हजार सात-बारा बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर केले जाणार आहे. याकरिता तलाठ्यांच्या मदतीने नगरभूमापन कार्यालयाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. महिनाभरानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शहरच्या नगरभूमापन कार्यालयाकडे 45 हजार 308 मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड आहे. याखेरीज या कार्यालयाच्या मर्यादेत 11 हजार 667 मिळकतींचे सात-बारा उतारे आहेत. हे सात-बारा रेकॉर्ड बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड केले जात आहे. आजअखेर यापैकी सुमारे 5 हजार सात-बारा बंद करण्यात आले असून त्याचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरात असूनही अनेक मिळकतींना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही. त्याऐवजी शेतीसाठी असणारा सात-बाराच या मिळकतींना लागू आहे. शहरी भागात असलेल्या मिळकतींचे सात-बारा बंद करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, रेकॉर्ड आणि मनुष्यबळ यांच्या अडचणीने हे काम संथगतीने सुरू आहे.
या कामाला गती देण्यात येणार असून याकरिता तलाठ्यांची मदत घेतली जाणार आहे. तलाठ्यांच्या मदतीने व्यापक मोहीम घ्या आणि दोन-तीन दिवसांत सात-बारा उतार्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेतील रेकॉर्ड हस्तांतरणाचे काम पूर्ण करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे नियोजन नगरभूमापन कार्यालयाकडून सुरू आहे.
सात-बारा आणि प्रॉपर्टी कार्डचे होणार टॅगिंग
ज्या सात-बारा उतार्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर केले जाणार आहे, त्या सात-बारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डचे टॅगिंग केले जाणार आहे. यामुळे प्रॉपर्टी कार्डवर त्या जागेच्या सात-बारा उतार्याचे क्रमांक आणि सात-बारावर त्या प्रॉपर्टी कार्डचा क्रमांक दिसणार आहे. यामुळे खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणूक होणार नाही.
शहरातील उर्वरित सात-बारांचे काय?
शहरी भागात असूनही अद्याप अनेक मिळकतधारकांकडे सात-बारा उताराच आहे. अशा मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. याकरिता शहराचा वाढीव सर्व्हे करण्याची गरज.