खोपा मधे खोपा,सुगरणीचा चांगला, पिलासाठी जीव झाडाला टांगला; चिऊताई घरटे बनविण्यात व्यस्त

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
निसर्गात राहणाऱ्या मानव प्राण्यासह सर्वांनाच निवाऱ्याची आवश्यकता असते.प्रत्येकजण आपापल्यापरीने निवाऱ्यासाठी घर तयार करत असतो.असाच आता पावसाळा तोंडावर आल्याने आपल्या निवाऱ्यासाठी सुगरण (चिमणी)पक्षी सुंदर,रेखीव,आणि नाजूक अशी घरटी झाडावर बनविण्यात व्यस्त झाली आहे.आणि निसर्गात झाडाझाडावर सुंदर अशा घरट्यांचा समूह पहायला मिळत आहे.
मानवी वस्तीत आणि निसर्गात रहाणारा चिमणी पक्षी कुणालाही आपला उपद्रव देत नाही.आपल्या चिव,अन् चिव या चिवाटाणे बाळ गोपाळासह सर्वांनाच हा पक्षी आकर्षित करतो. राखाडी रंगाचा असणारा हा सुगरण पक्षी आपले मजबूत घरटे बनविण्यासाठी निसर्गात हालचाल करताना दिसत आहे. राहण्यासाठी झाडे,नदी,विहीर या ठिकाणी झाडावर अथवा जिथे पाणी आणि कीटक मुबलक प्रमाणात असतात. अशा सर्व सोयींनी युक्त जागेची निवड केली जाते. घरटे बनवण्यासाठी गवताच्या काड्या अन्य नाजूक काड्यांची जमवाजमव करून एकमेकात गुंफण करून आपल्या नाजूक घरट्यांचे विणकाम करतात.घरटे एवढे मजबूत बनवतात की त्यामध्ये पाणी येणे देखील कठीण असते.खालच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वार असून हे घरटे उबदार असते.या घरट्यात आपल्या पिलांचे पालनपोषण करतात.इथ नरासह मादी आणि पिले यांचे वास्तव्य केले जाते. नराने बनविलेले घरटे चिमणी मादीला पसंत पडले तर त्यात ती वास्तव्य करते अन्यथा ते घरटे मोडून काढते. घरट्याबरोबर घरांच्या अडगळीत अथवा पडक्या भिंतीत,त्याचबरोबर मानवाने बांधलेल्या घरातही चिमण्या वास्तव्य करतात.
एकंदरीत आपल्याला निवारा मिळावा व आपले व आपल्या पिलांचे जतन आणि संगोपन व्हावे.यासाठी चिमण्या झाडावर आपला खोपा बनविण्यात व्यस्त आहे. या वेळी आठवतात त्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्ती
“अरे खोपा मधे खोपा
सुगरणीचा चांगला
पिलासाठी जीव
उंच झाडाला टांगला.