KDCC BANK : जिकडे विनय कोरे तिकडे अध्यक्षपदाचा गुलाल !
नव्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे म्हणून मुश्रीफ यांच्यासह आठ संचालक आहेत. शिवसेनेचे असूनही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने हे दोघे सत्तारूढ गटातून विजयी झाले आहेत.

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटातील सत्तारूढ गटाच्या उमेदवारांच्या पराभवामुळे नाराज झालेले आमदार डॉ. विनय कोरे हे कोणाला साथ देणार, त्यावर जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरणार आहे. सद्यस्थितीत कोरे हे सत्तारूढ गटासोबत असल्याने विद्यमान अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचा समझोता झाल्यास अडीच वर्षांनंतर काँग्रेसलाही अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा अध्यक्ष कोण होणार आणि कोरे कोणासोबत राहणार, यावर हे गणित अवलंबून आहे.
नव्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे म्हणून मुश्रीफ यांच्यासह आठ संचालक आहेत. शिवसेनेचे असूनही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने हे दोघे सत्तारूढ गटातून विजयी झाले आहेत. या दोघांचा पाठिंबा राष्ट्रवादीला राहिल्यास संख्याबळ १० वर पोचते. बँकेच्या राजकारणात मंत्री यड्रावकर व माने मुश्रीफ यांच्यासोबतच राहतील, अशी शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून दबाव आल्यास या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुश्रीफ यांना अध्यक्ष व्हायचे झाल्यास त्यांना कोरे यांच्या पाठिंब्याची गरज आहे.