आमच्यामुळेच विकास कामे हा विरोधकांचा गैरसमज; कोगनोळी ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सदस्यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कोगनोळी :
समाजाचे हित लक्षात घेऊन विकास कामे केली जातात. ती विरोधक नसतानाही करावी लागतात. मागील कालावधीमध्ये एकही विरोधी पक्षाचा सदस्य नसतानाही कोगनोळी ग्रामपंचायतीने अनेक विकास कामे राबवली आहेत असे मत ग्रामपंचायत सदस्य तात्या कागले यांनी व्यक्त केले. ते ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कागले पुढे म्हणाले, पी अँड पी सर्कल मधील जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी नगर व गायकवाड गल्लीतील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, गावातील पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, गटारींची स्वच्छता आदी विकास कामे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच केली जात आहेत. मंत्री व खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत. त्यांनीही गावात विकास कामे राबवावीत. त्यासाठी ग्रामपंचायतीचे संपूर्ण सहकार्य राहील. दूधगंगा नदी पासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाईप लाईन घालून प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा आक्काताई खोत, सदस्य सुनील कागले, महेश जाधव, प्रवीण भोसले, धनंजय पाटील, परशुराम चावर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.