छ. शिवाजी महाराजांच्या वरील प्रेमामुळेच पुतळ्याचा प्रश्न सोडवण्याचे ध्येय गाठले : संजय पाटील यड्रावकर

शिरोळ प्रतिनिधी :विनायक कदम
जयसिंगपूरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवायचाच त्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल हा निश्चय मनात करूनच सुरूवात केली होती, महाराजांवरील प्रेम आणि त्यांचा इतिहास वाचून मिळालेली प्रेरणा यामुळेच जयसिंगपूरात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न सोडवला असल्याचे उपनगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर यांनी सांगीतले. जयसिंगपूर वासियांनी टाकलेला विश्वास आेणि तमाम शिवप्रेमींची साथ असल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुतळ्याचा प्रश्न कसा सोडवला या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
ते म्हणाले, जयसिंगपूर वासियांनी आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर शहरातील महत्वाचे कांही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निश्चित झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि किटकट प्रश्न होता. ज्या जागेवर महाराजांचा पुतळा बसवण्याचे ठरले होते मुळात ती जागा सांगली – कोल्हापूर महामार्गालगत आहे. यामुळे जागा ताब्यात घेणे नगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाला शक्य नव्हते तर त्यासाठी मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करण्याची गरज होती. त्यातच मधल्या काळात राज्य शासनाने शासकीय जागांविषयीच्या धोरणात बदल केल्यामुळे जागा विनामोबदला नगरपालिकेच्या ताब्यात मिळेल याची शक्यताही धुसरच होती. कोल्हापूर जिल्ह्याचे पुर्वीचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्य शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करून विनामोबदला जागा नगरपालिकेच्या ताब्यात मिळण्याची मागणी केली होती मात्र शासनाने याबतीतील शुल्क भरण्याविषयी कळवले होते. त्यामुळे जवळपास तीन कोटी रूपये भरल्याशिवाय छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जागा मिळणे कठीण होते. पण महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जागा शासनाची आहे आणि ती जागा पैसे देऊन ताब्यात तर घेऊच पण ती विनामोबदला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. जागा पैसे भरून ताब्यात घ्यायचे म्हटल्यावर तब्बल तीन कोटी रूपयांच्या जवळपास रक्कम नगरपालिकेच्या माध्यमातून भरावे लागणार होते, ते सहजासहजी शक्य नव्हते. त्यामुळे पुतळ्याचा प्रश्न सुटेल याची कोणीही खात्री देत नव्हते असे स्पष्ट करत त्यांनी जागा विनामोबदला ताब्यात घेणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाल्याचे सांगीतले.
ते पुढे सांगताना म्हणाले, छ. शिवाजी महाराजांवरील प्रेम, आमच्या शहरात पुतळा झाल्यास वाटणारा अभिमान आणि कोणतीही शक्यता नसतानाही महाराजांनी केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर निर्माणे केले स्वराज्य आठवून काहीही करून पुतळ्याच्या जागेचा प्रश्न सोडवायचाच ही इच्छाशक्ती मनात निर्माण झाली. आजवर अनेक प्रश्न सोडविताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओळखी, ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अटीतटीचे प्रयत्न आणि काहीही झाले तरी जयसिंगपूरातील नागरीकांनी सोपवलेल्या जबाबदारीवर ठाम राहण्याच्या निर्धारातून आम्ही दोघेही पेटून उठलो आणि एकेक करत सर्व मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून काय करावे लागेल याची माहीती घेतली आणि प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगीतले.
कोणताही प्रश्न केवळ चर्चेतून सुटू शकतो याचा विचार केला. मंंत्रालयात तासनतास बसून आराखडा तयार करून घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनीही हा प्रश्न सुटलाच पाहिजे अशी भुमीका घेत सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले. आणि शेवटी सर्व कागदपत्रे तयार झाल्यानंतर हा प्रश्न मंत्रीमंडळ बैठकी समोर ठेवण्याचे निश्चित केले. मंत्रीमंडळाने विशेष बाब म्हणून हा प्रश्न मार्गी लावण्याचा ठराव संमत केला. मंगळवारी 3 आँगस्टला हा प्रश्न सर्व मंत्र्यांनी मंजूर करून तमाम जयसिंगपूर वासियांचे 50 वर्षापासूनचे स्वप्न साकार केले असल्याचे त्यांनी सांगीतले.
केवळ शहरवासियांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांनी दरवेळी आम्हाला विचारलेले प्रश्न आमच्यासमोर वारंवार येत होते. या शहराच्या प्रत्येक नागरीकाचा आमच्यावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले असे सांगतान संजय पाटील यड्रावकर यांनी शहरातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच यापुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी पुतळ्याचा विषय हा राजकीय विषय नसल्याचे स्पष्ट केले.