ऊसविकास योजना संकल्पना यशस्वीपणे राबवणारा शाहू पहिला कारखाना : राजे समरजीतसिंह घाटगे ; शाहू कारखान्याच्या वतीने आयोजित ऊसपीक परिसंवादास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री छत्रपती शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 33 टक्के शेतकऱ्यांचे पुर्वी ऊस उत्पादन एकरी 20 टनापेक्षा कमी होते.याची गांभीर्याने दखल घेऊन स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली 2003 मध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी ऊसविकास ही संकल्पना राबविली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून यामुळे शेतकऱ्यांचे ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस विकास ही संकल्पना यशस्वीपणे राबवणारा शाहू साखर कारखाना पहिला कारखाना आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
येथील शिव बसव सांस्कृतिक भवनमध्ये छत्रपती शाहू कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेअंतर्गत ” शाश्वत ऊस उत्पादन वाढ व आधुनिक तंत्रज्ञान ” या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
श्री.घाटगे बोलताना म्हणाले , स्वर्गीय राजेसाहेब नेहमी म्हणत असत कारखान्याने कितीही जादा दर दिला तरी उसाचे उत्पादन वाढविल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही. त्यासाठी त्यांनी कारखान्यात स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला व त्यासाठी स्वतंत्र भरीव निधीची तरतूद केली. त्यामुळे संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यात शाहू साखर कारखाना नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यांच्या पश्चात ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. कार्यक्षेत्रातील शेतक-यांनी शाहु च्या ड्रोन तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व्ही.एस.आय पुणेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. साळुंखे म्हणाले,ऊसाच्या एकरी उत्पादन वाढीसाठी जादा खते, औषधांची भरमसाठ मात्रा देऊन फायदा नाही. तर त्यासाठी जमिनीची सुपिकता, लागवडीची पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी शंभर टन ऊसाचे उत्पादन घेणे सहजशक्य होईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांसमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” मन की बात” या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
डॉ.साळुंखे बोलताना म्हणाले,ऊस शेतीसाठी पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे.जिथं पाणी कमी असेल तेथे सरासरी साडेतीन फुटाने सरी ठेवावी तर मुबलक पाणी असेल तर साधारणपणे साडेचार फुटांची सरी ठेवावी. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी विशेष प्राधान्य दिले तर मातीमध्ये जिवाणुंची संख्या वाढेल .ऊसपीकासाठी अत्यंत घातक असणारी हुमणीच्या नियंत्रणसाठी मेटॕरीझम, बीव्हीएम, ईपीएनची आळवणी करा.असेही डॉ.साळुंखे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी शाहू कृषी संघाचे संचालक बाळकृष्ण काईंगडे, प्रशांत घोरपडे,बाळासो काटकर,वाय.टी.पाटील, अरुण शिंत्रे, अभिजित घोरपडे, संजय चौगुले, प्रकाश पाटील, विलास पाटील यांच्यासह शेतकरी,ऊस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत,प्रास्ताविक शेती अधिकारी आर.एम.गंगाई यांनी केले.आभार ऊसविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.
” शाहू पोटॅश ” चे
लवकरच उत्पादन……
सध्या पोटॅश खत बाहेरून आयात करावे लागते. शाहू साखर कारखाना शाहू पोटॅश नावाने पोटॅश खताची निर्मिती करणार आहे. लवकरच हे खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती श्री घाटगे यांनी यावेळी दिली.