पोलीस निरीक्षक संजय मोरे, भुदरगड पोलीस ठाणे यांचा पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांच्याबाबत खुलासा

गारगोटी :
पोलीस निरीक्षक संजय मोरे, भुदरगड पोलीस ठाणे यांचा पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांच्याबाबत खुलासा….
भुदरगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 28/ 5 /2021 रोजी भुदरगड पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे आंबिटकर पेट्रोल पंप, आकुर्डे रोड या ठिकाणी असलेल्या नाकाबंदी पॉईंट जवळ मा. जिल्हाधिकारी सो. कोल्हापूर यांच्या आदेशाने लॉकडाऊनच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्याने फिरणारे इसम व वाहन चालक यांचेवर कारवाईचे दैनंदिन कर्तव्य बजावणे करत असताना, आकुर्डी गावातील रहिवासी भारतीय सैन्य दलातील जवान सागर सातपुते हे त्यांच्या वडिलांनी सोबत गारगोटी सिटी शहराकडे जाताना दिसून आल्याने त्यांना थांबवण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत संचारबंदी उल्लंघन करून रस्त्यावर उतरण्याची त्यांची कारणे संयुक्तिक वाटली नाहीत, तसेच त्यांच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे आढळून आले त्यांना त्याबाबत समज दिली असता त्यांनी कर्तव्य वरील पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांच्याशी दुरुत्तरे करून विनाकारण वाद निर्माण केला, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रेय शिंदे यांनी त्यांच्यावर रीतसर दंडात्मक कारवाई करून त्यांना त्याबाबतची पावती देखील दिलेली आहे परंतु सदर प्रकरणाचा कोणीतरी खोडसाळ हेतूने जाणीव पूर्वक व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमांमध्ये प्रसारित केलेला आहे.
सदरचे प्रकरण हे निव्वळ गैरसमजा मधून घडलेले असून पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांनी कोठेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. त्यांनी फौजी सागर सातपुते यांना कुठलीही अर्वाच्च भाषा वापरलेली नाही, पावती न देता पैसे घेतले असे देखील झालेले नाही. शिवाय पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे स्वतः देखिल रिटायर्ड फौजी / आर्मी मेन असून ते कर्तव्यावरील आर्मीमेन बरोबर उद्धट वर्तन करतील असे होऊ शकत नाही.
सध्या वाढत असलेला करुणा सात रोगाचा प्रादुर्भाव पाहता पोलीस हे स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांनी कायदा पाळावा संचारबंदी चे पालन करावे यासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य करीत आहेत. भुदरगड हा ग्रामीण भाग असल्याने शेती कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, त्याचप्रमाणे गारगोटी शहरांमध्ये औषध उपचारासाठी, औषध खरेदी करण्यासाठी अथवा लसीकरण करण्यासाठी येणारे नागरिक त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यांचे कारण योग्य असेल तर त्यांना विना-अडथळा जाऊ देण्यात येते, परंतु काही नागरिक हे कोणतेही कारण नसताना वारंवार घराबाहेर पडून संचार बंदीचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. त्यामुळे अपरिहार्यपणे पोलीस विभागाला त्यांच्यावर कारवाई करणे भाग आहे.
सदर बाबत केलेल्या कारवाईचा पुरावा भुदरगड पोलीस ठाणेच्या अभिलेखावर उपलब्ध आहे.
पोलीस निरीक्षक संजय मोरे, भुदरगड पोलीस ठाणे.