मुरगुड : नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत मावळा स्पोर्ट्स सडोली प्रथम तर शिवगर्जना स्पोर्टस राशिवडे द्वितीय क्रमांकाचा मानकरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व राजर्षी शाहू तरुण मंडळ व आर जे ग्रुप यांच्या वतीने मुरगूड ता कागल येथे आयोजित केलेल्या “नगराध्यक्ष चषक ” कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ संघ सहभागी झाले होते.अंतिम सामन्यात सडोली च्या मावळा स्पोर्ट्स ने राशिवडे च्या शिवगर्जना स्पोर्ट्स ला दहा गुणाने पराभूत करत अजिंक्य पदावर नाव कोरले.
मुरगूड चे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचे आयोजन केले होते.स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, तर माजी प्राचार्य पी व्ही पाटील,श्रीकांत निकम,कोजीमाशी चे सचिव प्रकाश गोधडे, अमर सनगर,विजय मोरबाळे, संजय चौगले,दगडू अत्तार आदींच्या हस्ते झाले.बक्षीस वितरण गोकुळ चे संचालक नंदकुमार ढेंगे,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तामामा खराडे,गोकुळ चे संचालक अभिजित तायशेटे, नंदू पाटील,सदाशिव गोधडे,विजय गोधडे,विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.यावेळी माजी कबड्डी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
मावळा सडोली व शाहू स्पोर्ट्स सडोली यांच्यातील उपांत्य सामना अटीतटीचा झाला पण मध्यंतर नंतर आक्रमक खेळ करत रामजी काशीद ओंकार चव्हाण यांच्या उत्कृष्ट चढाईने मावळा सडोली ने अंतिम फेरी गाठली,तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिव गर्जना राशिवडे संघाने सुरवाती पासून आक्रमक खेळ करत महागाव च्या केदारी रेडेकर फौंडेशन च्या संघास पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
अंतिम सामन्यात राशिवडे संघाकडून शुभम चौगले,रोहित परीट, मोहन चौगले यांनी आक्रंमक चढाया केल्या पण मावळा सडोली या संघाकडून सर्वच खेळाडूंनी सांघिक कामगिरी वर जोर देत चांगल्या पकडी केल्या त्यामुळे सुरवातीला चुरशीचा वाटणारा सामना मध्यंतर नंतर एकतर्फी झाला आणि मावळा सडोली ने अजिंक्य पद पटकावत रोख रक्कम आणि भव्य चषक पटकावला.शाहू सडोली संघास तृतीय क्रमांक दिला.
संतोष सनगर यांनी स्वागत केले.राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले.तर राहुल घोडके यांनी आभार मानले.पंच म्हणून विजय खराडे,मदन डवरी,संगीता फासके,रमजान देसाई,अनिकेत पाटील,विजय पाटील,संजय हवालदार,सुरेश खराडे,सुधीर बंडगर,के.बी.चौगले, यांनी काम पाहिले.अनिल पाटील यांनी निवेदन केले.