ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकरंजी येथे मुलींसाठी व्यायाम शाळा व कबड्डी मॅटचे क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन ; आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर करुन देशाचं नाव उंचवा : क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

मोबाईल व इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींचे ज्ञान मिळविण्यासाठी करा. सोशल मीडियाचा वापर योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी करा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर करा आणि आपल्या आई-वडिलांचं, गावाचं व देशाचं नाव उंचवा,’ असा मोलाचा मंत्र आज क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिला.
निमित्त होतं.. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याहस्ते झालेल्या कार्यक्रमाचे!
शासकीय अनुदानातून विद्यार्थिनींसाठी मिळालेल्या कबड्डी मॅट व व्यायामशाळेचे उद्घाटन आज क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रात जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार तसेच संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी शालेय ढोलताशांच्या गजरात व विद्यार्थिनींच्या अभूतपूर्व उत्साहात व टाळ्यांच्या कडकडाटात राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेवून त्यांना प्रतिसाद दिला. तसेच शाळेच्या ग्रंथालयाची पाहणी केली.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, येथील संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन हरीश बोहरा, उपाध्यक्ष उदय लोखंडे, सचिव बाबासाहेब वडींगे, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. इचलकरंजी ही ‘खो-खो- खेळाची पंढरी’ मानली जाते. ‘खेळ आणि खेळाडू’ यांच्याद्वारे इचलकरंजीचे नाव अधिक उंचावण्यासाठी निश्चितच प्रयत्न करु. तसेच यादृष्टीने क्रीडा विषयक अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्या म्हणाल्या, विद्यार्थी मुळातच हुशार खूप असतात, पण त्यांना योग्य दिशा देणे, चांगला मार्ग दाखवणे गरजेचे असते. शिक्षणाबरोबरच चांगलं ज्ञान देणं महत्त्वाचं असून हे काम गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्तमप्रकारे केलं जातंय, ही आनंदाची बाब आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान क्षेत्र निवडून डॉक्टर, इंजिनिअरच होण्याचा अट्टाहास न करता आर्किटेक्ट, फॅशन डिझायनर, फोटोग्राफर आदी विविध क्षेत्रांमधील ज्ञान संपादन करुन त्या क्षेत्रात अव्वल बनावे! असे राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी यावेळी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks