गुन्हाताज्या बातम्या

पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

धरणक्षेत्र वगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्या पावसाचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच पूरस्थितीत फ्रंटलाईन (आघाडी) वर कार्यरत रहावे असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची दूरदृष्यप्रणाली (व्ही. सी.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, पोलीस अधिकक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू नये याची दक्षता आत्तापासूनच घ्यायला हवी. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून आगामी 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन सुरु असून पुढील काही दिवसात कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचा विचार आहे. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियाजन करुन उर्वरित पाणीसाठा कसा कमी करता येईल याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे जेणेकरुन पूर परिस्थिती उद्भवणार नाही. तो धोका टाळता येईल जिवित आणि वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याला अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे असेही श्री. पाटील म्हणाले.

पूर स्थितीत अधिकाऱ्यांनी दक्ष असावे. आपले भ्रमणध्वनी 24 तास चालू ठेवावेत. मेसेज, (SMS) याकडे लक्ष द्यावे. कर्तव्यात कसूर करु नये यात कसूर करण्याऱ्यांची गय केली जाणार नाही – मंत्री जयंत पाटील

पूरस्थितीत एमएससीबी सह इतर आपत्कालीन यंत्रणांची बरीच धावपळ होते ती धावपळ होवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आत्तापासूनच दक्ष रहावे असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले तर कराडच्या पूर रेषेसाठी वेगळा निकष नको. कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच तो हवा तसेच सातारा जिल्ह्यातील धरणातून खाली किती पाणी सोडण्यात येणार याची कराड शहराला कल्पना देण्यात यावी जेणेकरुन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक सावध राहतील असे सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.

पूरबाधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना मॅप रिडींग (नकाशा वाचन) बाबत ट्रेनिंग देण्यात यावे. तसेच आगामी काही दिवसात पूरस्थितीबाबत कराडला बैठक घेण्यात यावी अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि वीजेचे योग्य नियोजन करण्यात यावे असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. जिल्ह्यात धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे आवश्यक नियोजन करावे व अनावश्यक पाणी टप्याटप्याने सोडण्यात यावे. कारण पावसाळी स्थितीत जिल्ह्यातील धरणात 25 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक राहिल्यास कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

प्रारंभी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणुमंत गुन्हाले यांनी झूम ॲपवर पूर परिस्थिती आणि धरण क्षेत्रातील स्थितीबाबत सादरीकरण केले.

यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आपआपल्या जिल्ह्यात पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा उहापोह केला. या बैठकीसाठी महसूल, पोलीस, जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह, जलसंपदा विभागाचेही अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks