लॉकडाऊनला विरोध म्हणून साताऱ्यातील पोवई नाका येथे खा.उदयनराजे भोसले चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर

सातारा प्रतिनिधी :
सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोक पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला विरोध म्हणून साताऱ्यातील पोवई नाका येथे चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केलं आहे. भीक मांगो आंदोलनात जमा केलेले 450 रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सणासुदीचे दिवस आल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. बँकेचे हप्ते भरायचे आहेत, उद्यापासून नो लॉकडाऊन. जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.
उदयनराजे भोसले यांनी यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही, असं उदयनराजे म्हणाले.