बिद्री परिसरात अवैध मटका तेजीत : प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
विशेष प्रतिनिधी :
कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या चार महिन्यांपासून सर्वच व्यवसाय अडचणीत असताना कागल तालुक्यातील बिद्री परिसरात मात्र अवैध मटका व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. बिद्री परिसरातील प्रमुख बाजारपेठांसह गावागावांमध्ये मटक्याची दुकानं खुलेआम मांडली जात आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त करणारा हा मटका एकीकडे राजरोसपणे सुरु असताना प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका का घेतली आहे ? असा प्रश्न स्थानिकांतून उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे किराणामालासह सर्व जीवनावश्यक व्यवसायांना विशिष्ट वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. एखाद्याने दुकान बंद करण्यास अर्धा तास जरी उशीर केला तरी त्याच्यावर ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासन लगेच दंडात्मक कारवाई करते. पण दुसरीकडे कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता सुरु असणाऱ्या मटक्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैध असणारा मटका व्यवसाय पानपट्टयांच्या टपऱ्या, घरांच्या आडोशाला राजरोस पणे सुरु आहे.
परिसरातील बिद्री, मुदाळतिट्टा, बोरवडे, वाळवे खुर्द , सोनाळी आदी गावांमध्ये मटक्याचा मोठा सुळसुळाट आहे. सध्या या मटक्याने परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणात हात – पाय पसरायला सुरुवात केली आहे. मटक्याच्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.पोलीसांनी अनेक वेळा प्रयत्न करुनही मटक्याचे समूळ उच्चाटन झाले नसल्याचे वास्तव आहे. इतरवेळी विशिष्ट वेळेत सुरु असणारा मटका सध्या लॉकडाऊनमुळे दिवसरात्र सुरु आहे. गावोगावी मटकाकिंग पुन्हा सक्रीय झाले असून मटक्याच्या चिठ्या राजरोसपणे वाटल्या जात आहेत.
यातून जमा होणारी रक्कम वरपर्यंत पोहचविण्यासाठी विशिष्ट यंत्रणा राबत असून लॉकडाऊनचा फायदा घेत ग्राहकांना लुबाडण्याच्या घटना सर्रास घडत आहेत.एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी पोलिस प्रशासन रस्त्यावर चोवीस तास कसोशीने प्रयत्न करत असताना, दुसरीकडे हे अवैध व्यावसायिक, याचा गैरफायदा घेत आहेत.
कोरोनाच्या काळात जीवनावश्यक व्यवसायावर वचक ठेवणारं प्रशासन लोकांना आयुष्यातून उठवणाऱ्या मटक्याला का पाठीशी घालतंय ? हे मात्र सर्वसामान्यांना पडलेलं मोठं कोड आहे.