इचलकरंजी : साडेदहा लाखांच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक

इचलकरंजी :
सहकारी बँकेत भरणा करण्यात आलेल्या बनावट नोटांप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अंबाजी शिवाजी सुळेकर (वय 42, रा. पासार्डे, ता. करवीर) व राजूभाई इस्माईल लवंगे (55, रा. कळंबे तर्फ ठाणे, ता. करवीर) या दोघांना अटक केली. या कारवाईत दोन हजार, 500, 200, 100 आणि 50 रुपयांच्या 10 लाख 54 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर आदींसह एकूण 11 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या नोटांचे बेळगाव कनेक्शन उघड झाले आहे.
दरम्यान, बनावट नोटांची व्याप्ती मोठी असून बेळगाव येथून या नोटा संशयितांना मिळाल्या आहेत. कर्नाटक राज्यातील अनेकांचा यामध्ये सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची माहिती पोलिस उपअधीक्षक बाबराव महामुनी व पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत चार दिवसांपूर्वी डिपॉझिट मशिनमध्ये साडेचार हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी आयुब खुतबुद्दीन रमजान (रा.साईनगर) या उद्योजकावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर कोल्हापुरातील उद्योजकाकडून त्याने रक्कम आणल्याचे सांगितले होते. सखोल तपास केल्यानंतर आयुबचा रिक्षा चालक मेव्हणा उस्मान शेख (रा.लक्षतीर्थ वसाहत) याच्याकडून ही रक्कम आल्याचे उघड झाले.