नदीकाठावरील शिवारात भात रोपांची पुनर्लागवड.

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
राधानगरी तालुक्यात आलेल्या महापुराने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.महापूर ओसरल्यानंतर त्याची दाहकता अधिकच जाणवत आहे.नदीकाठची ऊस व भातशेती तर पूर्णत: उद्ध्वस्त झाली.मात्र अशा विपरीत परिस्थितीतही जगाचा पोशिंदा बळीराजा नवी उर्मी आणि ऊर्जा घेऊन पूरबाधित शिवारात भात पिकांची पुनर्लागवड करून जगण्याचा अर्थ शोधत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यात झालेल्या अतीवृष्टी मुळे ओढे नदी नाले दुथडी भरून वाहून भोगावती नदीला महापूर आला.डोंगर माथ्यावरील भूस्खलन बरोबरच घरादारांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.मात्र याचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकर्यांना.दहा बारा दिवस नदीकाठावरील ऊस भात सोयाबीन भुईमूग पिकात पाणी गाळ साचून राहिल्याने पिके पूर्णत:उद्ध्वस्त होऊन होत्याचे नव्हते झाले.
मात्र आता भोगावती नदीला आलेला महापूर ओसरल्याने नदी काठावरील नुकसान झालेल्या शिवाराचे विदारक चित्र दिसत आहे.नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत ते यथावकाश पूर्ण होतीलही मात्र या विपरीत परिस्थितीत उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाची रोजच्या जगण्याची लढाई काही संपत नाही.भयावह व अवकळा आलेल्या शिवाराकडं पाहताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत आहे.डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंना मोकळी वाट करून देत तो बाधित क्षेत्रात जे मिळते ते पुनर्लागवड करून आपल्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात या ओळीचा अर्थ सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.