पन्हाळा तालुक्यातील कुंभी नदी पात्रात नवरा बायकोची मुलासह आत्महत्या

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
आपल्या मुलासह दाम्पत्यानं स्वतःला दोरीने बांधून घेऊन गोठे येथील नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास दीपक शंकर पाटील (वय ४०), वैशाली दीपक पाटील (वय ३५) व मुलगा विघ्नेश दीपक पाटील (वय १४) या तिघांचेही मुतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले. हे दांपत्य मुलगा विघ्नेश याच्यासोबत गुरुवारी रात्री अकरानंतर घराबाहेर पडले होते. आपल्या दोन मुलांसह व वडिलांसह असे एकूण पाच जणांचे हे कुटुंब गोठे या गावात राहत होते. आज सकाळी घराला बाहेरून कडी असल्याचे दिसताच शेजाऱ्यांनी घर उघडून पाहिले असता मोबाईलच्या खाली आत्महत्येची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळले. यानंतर गावकऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर नदी पात्राजवळ तिघांची चप्पलं आढळून आली. नदीपात्रात शोधाशोध केल्यानंतर तिघांचे दोरीने बांधलेले मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या दांपत्याची दहावीच्या वर्गात शिकत असणारी कन्या साक्षी दीपक पाटील ही आपल्या आजोळी चिंचवाड (ता. करवीर) या गावी गेल्याने या घटनेतून ती सुदैवाने बचावली. “आम्हाला माफ करा, कोणालाही जबाबदार धरू नये, प्रदीप घराकडे लक्ष ठेव, संजीव, अक्का, अमर अण्णाला सांभाळा. कोणीही तक्रार करू नये. मी, वैशाली व विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्जादा व दीपक माफ करा चुकलो”, अशा मजकुराची चिठ्ठी या दाम्पत्याने घरी मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली आढळली आहे. सामुदायिक आत्महत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे.