देशमुखांवरील कारवाई विचारपूर्वक रचलेले कटकारस्थान, हसन मुश्रिफांचा आरोप

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
आज सकाळी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह १० ठिकाणी छापे मारले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. अचानक घडलेल्या घडामोडीवरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार भाजपवर मोठा आरोप केला आहे. देशमुखांवरील कारवाई म्हणजे विचारपूर्वक रचलेले कटकारस्थान आहे. याप्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असं मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हा आरोप केला. हे विचारपूर्वक रचलेले कटकारस्थान आहे हे मी आधीचपासूनच सांगत होतो. माजी पोलीस आयुक्तांच्या एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित करतानाच हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
माझ्यासह अन्य नेत्यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यातून काहीच सिद्ध झालं नाही. केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा खटाटोप होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल, पानी का पानी होईल आणि देशमुख या प्रकरणातून नक्कीच निर्दोष होऊन बाहेर पडतील, असा दावाही त्यांनी केला.