‘वरद बाळा, ये रे परत….!’; वरदच्या फोटोपूजनवेळी आई-वडिलांची आर्त हाक, ग्रामस्थही गहिवरले.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी ( ता.कागल ) येथील अपहरण करुन खून झालेल्या दुर्देवी वरद पाटील याचा फोटोपूजन विधी जड अंत:करणाने घरगुती स्वरुपात पार पडला. कालपरवापर्यंत घरात बागडणाऱ्या लाडक्या मुलाच्या फोटो पूजनाची वेळ त्याच्या आई – वडिलांवर आली. यावेळी ‘ वरद बाळा , ये रे परत …. ! ‘ म्हणत त्याच्या आईने फोडलेली आर्त हाक अनेकांच्या काळजाला चिरत गेल्याने उपस्थित ग्रामस्थही गहिवरले.
सायंकाळी नागनाथ देवालयामध्ये महिला व ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन वरदला श्रद्धांजली वाहिली. यावेळी पाणावलेले डोळे, ह्रदयामध्ये क्रूर नराधामाने केलेल्या कृत्याची चीड, आरोपी नराधमांला फाशीची शिक्षा होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करत, जोपर्यंत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी राहून त्यांना आधार देण्याचे अभिवचन दिले. याप्रसंगी अनेकांनी मनोगतातून आपला संताप व्यक्त केला.
सदर खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची याकामी नियुक्ती करावी व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या आशयाचे निवेदन सोनाळीतील तनिष्का महिला ग्रुप व महिला बचत गटांच्यावतीने मुरगुड पोलीस स्टेशनचे स्वप्नील मोरे व महिला कॉन्स्टेबल सरिता देवर्डेकर यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सरपंच तानाजी कांबळे, उपसरपंच सुवर्णा भोसले, प्रमिला पोवार, सुरेखा पाटील, ललिता पाटील, माजी सरपंच सत्यजित पाटील, मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील, मधुकर पाटील,संभाजी कुलकर्णी, साताप्पा सोनाळकर, रामचंद्र कपले,प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.