हुंडा मागणी करून सुरुते येथील विवाहितेचा छळ.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
चंदगड तालुक्यातील सुरुते येथील विवाहित महिला सौ.गायत्री राहुल कांबळे यांनी आपले पती ,दीर,सासू व सासरे यांचे विरोधात चंदगड पोलीस स्टेशन येथे हुंडा मागणी करून मानसिक व शारिरीक छळ करीत असले बाबतची तक्रार १५ एप्रिल २०२१ रोजी दाखल केली आहे.
पोलीस निरीक्षक तळेकर यांनी सदरील अन्यायग्रस्त महिलेला समुपदेशनाच्या नावाखाली गेली आठ दिवस तक्रार नोंद करून न घेता वेळकाढूपणा करीत आहेत.अशी तक्रार अन्याय अत्याचार ग्रस्त महिला गायत्री कांबळे हिने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.
सदर विवाहित महिलेचा विवाह चार महिन्यापूर्वी डिसेंबर २०२० सुरुते ता.चंदगड येथील श्री राहुल अप्पू कांबळे यांच्याशी झाला.अप्पू बळवंत कांबळे यांचे सर्व कुटुंब सुशिक्षित असून घरी सर्वजन नोकरीला आहेत.असे असताना या सर्वांनी संगनमत करून नवविवाहित महिलेकडे १२ लाख रु.हुंडा मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला ही बाब निंदनीय वाटते.
या घटनेमुळे आजही हुंड्याच्या नावाखाली मुलीच्या माहेरचे आर्थिक शोषण करण्याची परंपरा सुरु आहे ही शरमेची बाब आहे.याबाबत रीतसर तक्रार नोंद करून घेवून संबंधितांची कसून चौकशी करणे ही बाब चंदगड पोलीस यांची असताना श्री तळेकर यांनी सदर तक्रार नोंद करून पुढील कार्यवाही केली नाही.त्यामुळे अन्यायग्रस्त महिलेला FIR ची प्रत मिळाली नाही.मात्र याप्रकरणी स्वतः समुपदेशन करणाऱ्या श्री तळेकर यांनी समुपदेशक म्हणून हवालदार मकानदार यांच्या करवी सदरील महिला व वडिलांना पंचकरवी दबावतंत्र व भीती दाखवून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जात आहे.
त्यामुळे सदर अन्यायग्रस्त नवविवाहितने न्याय मागणे साठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांचेकडे आपली तक्रार नोंद करून घेवून संबंधित जबाबदार आरोपींच्यावर व तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.