ताज्या बातम्या

थंडावली हलगी , सांगा कशी भरायची पोटाची खळगी ! कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी उत्पन्न बुडाले, हलगीवादकांची उपासमार

बिद्री प्रतिनिधी / अक्षय घोडके : 

कोणत्याही मंगल कार्याचा शुभारंभ असो की लग्नाचा कार्यक्रम, कुस्तीचे मैदान असो अथवा विजयी मिरवणूक. अशावेळी हलगीचा ठोका पडला की तिच्या आवाजाने अंगावर शहारे व स्फुरण येते.परंतू मागील वर्षापासून कोरोनामुळे घरगुती व सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने हलगीवादकांचे उत्पन्न बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेहमी कडाडणारी हलगी दोन वर्षांपासून थंडावल्याने पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

                       कार्यक्रम घरगुती असो वा सार्वजनिक त्यामध्ये वाद्य नाही असे कधीच होत नाही. त्यातल्या त्यात लग्न, कुस्त्यांचे फड, उदघाटनांचे कार्यक्रम, निवडणूकीच्या प्रचार सभा, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका अशा ठिकाणी हमखास ऐकायला मिळणारे वाद्य म्हणजे हलगी. तिच्या जोडीला कैताळ आणि घुमकं झालं की मग या सर्वच कार्यक्रमांची रंगत काही वेगळीच असते. त्यामुळे अशा हलगी वादन करणाऱ्या पथकांना कार्यक्रमांसाठी नेहमीच मागणी असते.

                  दरवर्षी दिवाळीनंतर लग्नांचे मुहूर्त सुरु होतात. एप्रिल – मे महिन्यात तर लग्नांचे अनेक मुहूर्त असतात. हे मुहूर्त साधण्यासाठी वर किंवा वधू पक्षांची धावपळ असते. अशावेळी लग्नाच्या इतर तयारी बरोबरच हलगीवादकांचेही अगोदरच बुकींग करावे लागते. त्यामुळे हलगीवादकांना या दिवसांत मोठी मागणी असते.या तीन – चार महिन्यांत हलगीवादकांना चांगले उत्पन्न मिळते, ज्याच्यावर पुढील एक वर्षाचा कुटूंबाचा गाडा चालवला जातो.

                याशिवाय दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या यात्रा – जत्रांमध्येही हलगीवादकांना मोठी मागणी असते.विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरांत कुस्त्यांचे मोठे फड भरविले जातात. या कुस्ती मैदानात पैलवानांच्या एवढीच चर्चा होते ती हलगी वादन करणाऱ्या वादकांची.हलगीच्या ठोक्यावर पैलवानांना प्रोत्साहन देणारे आणि प्रेक्षकांना तिच्या कडाडणाऱ्या आवाजावर डोलायला लावणारे हलगीवादक चांगलाच भाव खातात.

                         याशिवाय कौटुंबिक किंवा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, उदघाटन समारंभ, निवडणूकीचे उमेदवारी अर्ज भरणे, जाहीर प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, विजयी मिरवणूका याठिकाणी हलगीचा ठोका हमखास ऐकायला मिळतो. त्यामुळेच निवडणुका आणि हलगी यांचा जवळचा संबंध आहे. यासोबतच विविध शुभारंभाच्या खाजगी आणि सरकारी कार्यक्रमांचीही निमंत्रणे हलगीवादकांना आवर्जुन दिली जातात. यातुन मिळणाऱ्या बिदागीतून हे हलगीवादक आपला आणि आपल्या कुटूंबाचा दररोजचा खर्च भागवतात.

                       परंतू मागील वर्षापासून आलेल्या कोरोनामुळे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर घरगुती कार्यक्रमांना उपस्थितांची मर्यादा घालून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वच कार्यक्रमांतून हलगीवादकांना वगळल्याने त्यांचे हक्काचे मिळणारे उत्पन्नच बुडाले आहे. केवळ हलगीवादकच नव्हे तर त्यांच्या सोबत घुमके व कैताळ वाजवणारे हे लोकदेखील आर्थिक अडचणीत आले आहेत. हाताला कामच नसल्याने सध्या या सर्वांची उपासमार सुरु असून आपली आणि आपल्या कुटूंबियांच्या पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे

 लॉकडाऊनमुळे उत्पन्नाच्या संधीही नाहीत……

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हलगीवादकांना मजुरी करावी म्हंटले तरी कोणतेच काम मिळत नाही.उत्पन्नाच्या सर्वच संधी बंद असल्याने यापैकी काही हलगीवादक सध्या शेतावर मजूर म्हणून काम करत आहेत. काहीजण तर पडेल ती कामे करुन कुटुंबांतील लहान मुले आणि वृद्धांचा सांभाळ करत असल्याने हे हलगीवादक आता परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत.

” एखाद्या कार्यक्रमात हलगीवादन केल्यावर अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. यापैकी निम्मी रक्कम कैताळ आणि घुमकं वाजविणाऱ्यांना द्यावी लागते. उर्वरीत रकमेत प्रवास,वाद्यांची दुरुस्ती आणि स्वतःची मजुरी यांसाठी खर्च होते. सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काही कामच नाही. त्यामुळे आमची उपासमार होत असून सरकारने इतरांप्रमाणे आम्हा कलाकारांनाही मोफत रेशन आणि महिना पाच हजार रुपये बेकार भत्ता द्यावा, अशी आमची मागणी आहे. “

– विकास अवघडे , हलगीवादक बोरवडे , ता. कागल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks