गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

कोल्हापुर, प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
आज गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यावेळी दुंडगे आणि हेब्बाळ गावातील पूरग्रस्त नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गडहिंग्लज तालुक्यामध्ये 22, 23 आणि 24 जुलै या तीन दिवसांमध्ये 344 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. यामुळे, तालूक्यातील 23 गावांमधील 1743 कुटुंबे बाधित झाली आहेत.
तालुक्यातील नदीकाठच्या गावात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी, अतिवृष्टी व महापुरामुळे उत्तूर येथील संजय उत्तूरकर यांच्या नुकसान झालेल्या पोल्ट्रीची पाहणी केली. तसेच, तालुक्यातील सर्व पंचनामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
गडहिंग्लज तालुक्यातील जुने ओढे-नाले जे बुजले आहेत त्यांची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी करून ओढ्या-नाल्यांचे पाणी पावसाळ्यात नागरी वस्तीत शिरणार नाही, याबाबत योग्य आणि कायस्वरूपी उपायोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.
तसेच गडहिंग्लज तालुक्यातील नद्यांमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुनर्वसन करताना संबंधित पूरग्रस्त बांधवांना शासकीय योजनेतुन घरकुलसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दील्या आहेत.
यावेळी, आमदार राजेश पाटील, संग्राम नलवडे, कॉम्रेड संपत देसाई, विजयराव देवणे, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, रमेश पाटील, बी.एन. पाटील, बसवराज आजरी, बालेश नाईक, बाळासाहेब पाटील, संदीप देसाई, डॉ. संजय पाटील, विजय पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर, प्रशांत देसाई, प्रांताधिकारी विजया पांगारकर, अमर चव्हाण, श्रीप्रसाद तेली, सरपंच ज्योती धनवडे, रमजान अत्तार, उपस्थित होते.