गडहिंग्लज : गिजवणे गावात कायम स्वरुपी तलाठी नियुक्त करावे-मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी :(सोहेल मकानदार)
गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावात कायम स्वरूपी तलाठी नियुक्त करावे या मागणी साठी गडहिंग्लज शहर मनसेच्या वतीने प्रांताधिकारीना निवेदन देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे हे शहरालगत असणारे चार ते पाच हजार लोकवस्तीचे गाव. शहराच्या विस्तारात बरेच नागरिक गिजवणे गावात सध्या वास्तव्यास गेले असून जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या राजकारणातल्या बऱ्याच छोट्या-मोठ्या घडामोडी या गावातून घडत असतात. सध्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा मान सुद्धा गिजवणे गावाला मिळालेला आहे. गेल्या काही वर्षापासून गिजवणे गावाला कायमस्वरूपी तलाठी नियुक्त नाही. त्यामुळे गिजवणे गावचा कारभार हा प्रभारी तलाठ्याकडे सोपवलेला आहे. प्रभारी तलाठ्याला एकाच वेळी दोन गावचा कारभार करणे अवघड जात असल्यामुळे त्याची गिजवणे गावातील उपस्थिती ही गेल्या वर्षभरापासून नियमित नाही.परिणामी गावातील लोकांना शासकीय कामांमध्ये लागणारे दाखले तसेच इतर कामापासून वंचित राहावे लागत आहे. वेळेत दाखले न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना शैक्षणिक तसेच शासकीय योजनांपासून दूर रहावे लागत असल्यामुळे नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे. तलाठी अभावी होणाऱ्या खोळंब्यामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे. तरी शासनाने यात त्वरित लक्ष घालून गिजवणे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा.तसेच येत्या पंधरा दिवसात कायमस्वरुपी तलाठी नियुक्त न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे यांचे सह्या आहेत.