गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील सर्व सरपंच, कामगार तलाठी, व पोलिस पाटील यांनी आपले कार्यक्षेत्रातील एखाद्या वहितीधारक शेतकऱ्याचा अथवा त्याच्या कुटूंबातील सदस्याचा अपघातामुळे दुदैवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती द्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच कागदपत्रांचे पूर्ततेकरीता कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा ग्रामस्तरावरील कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
सन 2020-21 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याचा पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी एक सदस्य) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 6 एप्रिल 2022 या कालावधीकरिता आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रू. 2 लाख व एक अवयव निकामी झाल्यास रू. 1 लाख नुकसान भरपाई युनिव्हर्सल सॉपो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीमार्फत तर मे. ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. नवी मुंबई यांना देण्यात येते. या योजनेचा शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लाभार्थी पात्रतेच्या अटी-
10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्यांच्या कुटुंबातील ( आई- वडील, शेतकऱ्याची पती/ पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती ) 10 ते 75 वयोगटातील कोणताही 1 सदस्य.
आवश्यक कागदपत्रे-
विहित नमुन्यातील पुर्वसुचना अर्ज, 7/12 उतारा, वयाचा दाखला, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अपंगत्व आले असलेस अपंगत्व प्रमाणपत्र, ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नांव 7/12 वर आले असेल अशी संबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड), शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6 क नुसार मंजून झालेली वारसाची नोंद, शिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाच्या प्रपत्र क मधिल कागदपत्रे
विमा संरक्षणामध्ये समाविष्ठ असणाऱ्या बाबी –
1) रस्ता / रेल्वे अपघात 2) पाण्यामध्ये बुडून मृत्यू 3)जंतूनाशक अथवा अन्यकारणामुळे विषबाधा 4) विजेचा धक्का 5) वीज पडून मृत्यू 6) खून 7) सर्पदंश/विंचूदंश 8) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या 9) उंचावरून पडून मृत्यू 10) जनावरांच्या हल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यू 11)अन्य कोणतेही अपघात
विमा संरक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या बाबी –
1) विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व 2) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे 3) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात 4) अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात 5) नैसर्गिक मृत्यू 6) भ्रमिष्टपणा 7) बाळंतपणातील मृत्यू 8) शरीरांतर्गत रक्तस्त्राव 9) मोटार शर्यतीतील अपघात 10) युध्द 11) सैन्यातील नोकरी 12) जवळच्या लाभधारकाकडून झालेला खून अन्य कोणतेही अपघात
क्षेत्रिय स्तरावर कृषि पर्यवेक्षक हे सादरकर्ता अधिकारी असून त्यांच्या माध्यमातून प्रस्ताव स्विकारून विमा कंपनीस कृषि विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे, अन्य मार्गाने विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केल्यास असे प्रस्ताव विमा कंपनी विचारात घेत नाही. अपघातानंतर 45 दिवसांचे आत सदरचा दावा नोंदविणेत यावा, असेही श्री. वाकुरे यांनी कळविले आहे.