गोकुळ प्रचारातील आरोप प्रत्यारोप संपले नेतृत्वाचे लक्ष आता मतदानाकडे . . .

कुडूत्री (प्रतिनिधी) सुभाष चौगले
जिल्ह्याच्या राजकारणातील नेतृत्वाचा कस लागणारी आणि अस्तित्व टिकवणारी निवडणूक म्हणजे गोकुळची होय नुकत्याच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचार तोफा आता थंडावल्या आणि आरोप प्रत्यारोपाची फैरी झडल्यानंतर व एकमेकावर तोंडसुख घेतल्यानंतर आता नेतेमंडळींचे लक्ष येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. नेते मंडळींच्या मनाला आता एकच हुरहूर लागली आहे. तशी गोकुळची ही निवडणूक पहाता कुणालाच सोपी नसल्याने कुणाची आघाडी जिंकणार याबाबत जिल्ह्यात आता तर्क वितर्क यांना उधाण आले आहे.
गेले एक महिना निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यापासून निवडणूक प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात वेग आला होता.सत्तारुढ आघाडी पुढे विरोधी सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने चांगलेच आव्हान निर्माण केले.इथून मागे होणारी एकतर्फी निवडणूक या वेळी एकतर्फी राहिलीच नाही.विरोधी आघाडीने सत्ताधारी आघाडीला चांगलाच घाम फोडला.आणि यामुळेच ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक एक ठराव धारक, व नेतेमंडळींना मिळवताना दोन्ही बाजूची चांगलीच दमछाक झाली आहे हे निश्चित.
गोकुळचे कार्यक्षेत्र असलेल्या एकूण १२ तालुक्यातून ३६५० च्या आसपास ठराव धारक मतदान करणार आहेत. या सर्व ठराव धारकांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.यांच्या मनाचा आणि मताचा कुणालाही ठावठिकाणा नसल्यानें नेमके मतदान कसे होणार याचा अंदाज कुणालाही नसल्याने निकालाची रंगत वाढणार आहे.
ठराव धारक हे या मतदानात प्रक्रियेत एकाच आघाडीला मतदान करतील का ? याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाही. क्रॉस व्होटिंग सुध्दा मोठ्या प्रमाणावर होणार आहे याची चिंता उमेदवारांसह नेतेमंडळींना देखील असून एकतर्फी सत्ता येईल यासंबंधी कुणालाच अंदाज बांधता येत नसल्याने राजकीय दृष्ट्या ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
गेले अनेक दिवस प्रचार सभेत आरोप – प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडल्या असल्या तरी अनेक मागील निवडणुकीचा विचार करता कोरोनाच्या धर्तीवर अनेक ठराव धारकांनी सभेना आपली उपस्थिती दाखवली नाही हे तितकेच खरे आहे.

यंदा सहलींचे नियोजन नाही
गोकुळच्या इतून मागच्या निवडणुकीत ठराव धारकांच्या साठी आधिच सहलींचे नियोजन केले जायचे.आणि म्हणावी तशी काळजी घेतली जायची पण कोरोना धर्तीवर हे सहलींचे बेत रद्द झाल्याने ठराव धारकांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे.
ठराव धारकांची नेमकी भूमिका काय . . .
या वेळच्या निवडणुकीत ठराव धारकांनी कुणालाच अंदाज दिलेला नाही.येईल त्या उमेदवाराला आमचे सहकार्य आपल्याच राहील असा विश्वास दिला आहे.त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपल्या बाजूने ठराव धारकांची गणती केली आहे.नेमके हे ठराव धारक मतदानाचा शिक्का कुणाला देतात हे ठराव धारकांचे मनात दडलेले एक गुपितच आहे.