गडहिंग्लज : दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाऊननंतर नागरिक रस्त्यावर : शहरात सोशल डिस्टन्सचा नियम धाब्यावर.

गडहिंग्लज :
दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर नागरिकांनी रस्त्यावर येऊन आज (सोमवार) प्रचंड गर्दी केली. गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली. संभाव्य लॉकडाऊनच्या तयारीसाठी लोकांची धांदल उडल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात दिसून आले. काही ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडल्याने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली. तर बँकांच्या दारातही नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने शनिवारी, रविवारी वीकेंड लागू केला होता. दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात राहणे पसंत केल्याने लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. परंतु येत्या दोन दिवसांत ८ किंवा १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. त्यातच मंगळवारी गुढीपाढवा असल्याने खरेदीसाठी आज सकाळपासून नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी करत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला.तर गुढीपाढव्यादिवशी खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी पैसे काढण्यासाठी बँकांच्या दारात रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. बाजार पेठ, लक्ष्मी मंदिर परिसर व इतर परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.