नंदगावातील ‘त्या’ चौकात होत आहेत वारंवार अपघात ; सीसीटीव्ही फक्त शोभेसाठीच

नंदगाव प्रतिनिधी:
नंदगाव (ता.करवीर) येथील विद्या मंदिर नंदगाव समोरील चौकात वारंवार अपघात होत आहेत. मुख्य मार्ग असल्यामुळे या चौकात पूर्वेस वाणी गल्लीतून (गावातून),पश्चिमेस इस्पुरली – नागाव कडून, दक्षिणेस खेबवडे कडून व उत्तरेस कोल्हापुर कडुन मार्ग येतो.रस्त्याच्या कडेला छोटी छोटी दुकाने व प्राथमिक शाळा ही आहे. नंदगावला इतर गावांशी जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहतूक व माणसांची रहदारी मोठ्या प्रमाणात चालू असते. अपघात होऊ नये म्हणून कोणत्याही बाजूस गतिरोधक किंवा सूचना फलक लावलेले नाहीत. कारखान्याची ऊस वाहतूक सुद्धा याच मार्गावरून जीव धोक्यात घालून केली जाते. याच चौकात ग्रामपंचायतीच्या वतीने सी.सी. टि. व्हि. कॅमेरा हि बसवण्यात आला आहे. परंतु तो हि कित्येक महिन्यापासून बंद आवस्थेत आहे. गावामध्ये चोरी किंवा अशा प्रकारची घटना घडल्यास सीसीटीव्ही चा उपयोग होऊ शकतो परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे गेली कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने लवकरच लक्ष न दिल्यास एखादा गंभीर अपघात किंवा यासारखी घटना घडू शकते. गावातील बंद अवस्थेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर चालू करावे व या चौकात अपघात रोखण्यासाठी गतिरोधक किंवा यासारखे दुसरे उपाय काही करता आले तर ते लवकरात लवकर करावे अशी नंदगाव च्या ग्रामस्थांच्या कडून मागणी होत आहे.