भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली :
भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते.
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती.
मिल्खा यांचे विक्रम
● १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
● अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले.
● मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
● तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला.
● मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली.
● १९६२ मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
● १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम ५० वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता.
● २०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.