कोरोना उपाययोजना व अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोरोना प्रतिबंध उपाययोजना व अंमलबजावणीबाबत तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधकारी भाऊ गलंडे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अ.मा. पोळ उपस्थित होते.
या समितीमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांचा समावेश असणार आहे. तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपाययोजना, नियोजन आणि अंमलबजावणी याबाबतची जबाबदारी या समितीवर असणार आहे.ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी पुरेसा साठा ठेवावा
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी ऑक्सिजन उत्पादक,पुरवठादार यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
ते म्हणाले, मागील वर्षीचा अनुभव पाहता सरासरी किती पुरवठा होतो याबाबत सर्वांनी तयारी ठेवावी. नगरपालिकानिहाय असणारी कोविड उपचार करणारी खासगी रुग्णालये याबाबतची माहिती तयार ठेवावी. महापालिकेने शहरातील नियोजन करुन सर्व यंत्रणा सतर्क ठेवावी. खासगी रुग्णालयांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा याबाबतची माहिती ठेवावी. शेंडा पार्क, संजय घोडावत विद्यापीठ, आय.जी.एम. सीपीआर येथील ऑक्सिजन टँकमध्ये साठा ठेवावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. डी. शेळके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.एस. घुणकीकर, तहसिलदार अर्चना कापसे, नायब तहसिलदार डॉ. अर्चना कुलकर्णी यांच्यासह ऑक्सिजन उपत्पादक व पुरवठादार उपस्थित होते.
रुग्णालयांसाठी लेखाधिकारी नियुक्त करा
खासगी रुग्णालयांची देयके तपासणीसाठी लेखाधिकारी नियुक्त करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक लेखाधिकाऱ्यांने स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवावे. त्यामध्ये रुग्णालयाने दिलेले देयक, त्याबाबत करण्यात आलेले परीक्षण, अंतिम देयक याबाबतच्या नोंदी ठेवाव्यात. याबरोबरच बेड उपलब्धतेसाठी प्रत्येक रुग्णालयासाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त करावा. महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत लेखाधिकारी नियुक्त करा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी बैठकीत दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने, महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी वर्षा परीट, सहायक संचालक दिपक शिंदे, संजय शिंदे, राहूल कदम, डॉ. अशोक पोळ उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांनी हॉटेलसोबत समन्वय ठेवावा
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी आतापासूनच तयारी ठेवून संबंधित हॉटेल सोबत समन्वय ठेवावा. त्याबाबतची यादी तयार करावी. मागील अनुभव पाहता आतापासूनच सतर्क राहून तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी खासगी रुग्णालय आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत दिली. बैठकीला महापालिका उपायुक्त निखील मोरे, ॲस्टर आधारचे डॉ. केणी, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. सुज्ज्ञा दिवाणी यांच्यासह हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.
अग्निशमन रोधक यंत्रणाबाबत गांभीर्याने तयारी ठेवावी
कोणतीही आगीची दुर्घटना घडणार नाही याबाबत सर्व यंत्रणांनी अग्निशमन रोधक यंत्रणाबाबत गांभीर्यांने तयारी ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आणि महापालिकेचे अग्निशमन दल या सर्वांनी समन्वयाने काळजीपूर्वक फायर तसेच इलेक्ट्रिक ऑडीटबाबत पूर्तता करावी. सीपीआर प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी इलेक्ट्रिक आणि फायर ऑडीट समितीच्या बैठकीत दिली. यावेळी सीपीआर, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज याबाबतही आढावा घेतला. बैठकीस कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. विजय बर्गे, चिफ फायर ऑफिसर रणजित चिले, डॉ. आर.आर. शेटे, प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
एचआरसीटी करण्याबरोबच आरटीपीसीआरला स्वॅब द्या
खासगी वैद्यकीय व्यवसायिकांच्याकडे एचआरसीटीसाठी आलेल्या रुग्णांनी आरटीपीसआरसाठी स्वॅब द्यावा. त्याचबरोबचक इली, सारी संशयित रुग्णांचाही स्वॅब घ्यावा. याबाबत खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना पत्र पाठवावे, अशी सूचना टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली. बैठकीला डॉ. विजय बर्गे, डॉ. अनिता सैब्बनावर आदी उपस्थित होते.