प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे यांचं कोरोनाने निधन

औरंगाबाद :
प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे आज निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. एकनाथ महाराज यांची भारूडं आधुनिक काळात लोकांच्या ओठांवर आणणारे लोककलावंत म्हणून निरंजन भारकरे यांची ओळख आहे. निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातून शेवटपर्यंत जनजागृती करण्याचं काम केलं.
भारुड या लोककलेला देश-विदेशात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ भारुडकार निरंजन भाकरे यांच्या निधनामुळे सामाजिक भान जपणारा गुणी लोककलावंत हरपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.