उद्यापासून कर्नाटकात प्रवेश बंद; लॉकडाऊनमुळे फक्त अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू

निकाल न्यूज नेटवर्क
कोगनोळी :
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्नाटक राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने राज्यात 10 मे ते 24 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी शेजारी राज्यांमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
कर्नाटक शासनाने यापूर्वीच राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांनाच कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. आता मात्र नव्याने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनाच राज्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाद्वारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनांनाच राज्यात प्रवेश दिला जात होता. परंतु उद्या दिनांक 10 पासून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच वाहनांना येथून परत मागे पाठवले जाणार आहे.
या तपासणी नाक्यावर पोलिसांच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पथकातील वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांचेकडून सर्व वाहनातील प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करून नोंदवहीमध्ये प्रवास मार्गाची नोंद घेण्यात येते.