गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

कोल्हापूर प्रतिनिधी :
गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याला दुजोरा दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळसह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली होती. स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, तथापि, यावरून संभ्रम निर्माण झाल्याने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शनही मागवले; परंतु नंतर त्यांनीच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करून त्यातील संदिग्धता दूर केली होती.उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.