ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नो मास्क नो एन्ट्री या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा ; लॉकडाऊन नाही पण सतर्क रहा : सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, नो मास्क नो एन्ट्री या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. लॉकडाऊन आता कोणत्याही घटकाला परवडणारे नाही त्यामुळे सतर्क रहा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली नो मास्क नो एन्ट्री या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. मागील अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रिवर भर द्यावा लागेल. सर्वजण यंत्रणा सज्ज ठेवू आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोव्हिड पासून मुक्त ठेवू.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे. प्रशासनास मदत करावी, असे आवाहन केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, एलपीजी असोसिएशन, रिलायन्स मॉल, स्टार बझार, मार्केट यार्ड आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शक सुचना अशा

मास्क नाही तर प्रवेश नाही हा फलक लावून त्याची अंमलबजावणी हवी.

प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार वाहतूक हवी.

५० टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत,

स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, पॉस मशिनसाठी सॅनिटायझर वापरा.

लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी गेलं पाहीजे.

खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे.

मास्क शिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी.

शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा.

मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दक्ष राहून नियमांचे काटेकोर पालन करावे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks