जिल्ह्यातील 30 शाळांमध्ये लवकरच ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणार : समरजितसिंह घाटगे; राजे फाउंडेशन मार्फत सोहाळे-बाची शाळेत ई – लर्निंग सुविधेचे उदघाटन

आजरा प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात गुणवत्ता आहे. त्यांची कष्ट करण्याची तयारीही आहे .मात्र सुविधांअभावी त्यांची गैरसोय होत आहे.ती दूर करण्यासाठी राजे फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम भागातील अशा ३० शाळांमध्ये लवकरच ई- लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणार आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले .
राजे फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांत ई- लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा आम्ही महिन्यांपूर्वी राजे फौंडेशनच्या आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात केली होती त्याची पूर्तता आज
सोहाळे- बाची ता.आजरा येथील प्राथमिक शाळेतील ई-लर्निंग सुविधेचे उद्घाटनाने झाली.
ते पुढे म्हणाले, ही सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देताना ग्रामीण भागातील रेंज नसण्याच्या असुविधेचा विचार करून ऑफलाइन पद्धतीने देण्यात आले आहे. विक्रीपश्चात तीन वर्षांची सेवा देण्यात येणार आहे .पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट केला आहे .ऑडीओ व व्हिडीओ अशा दोन्हीही पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे. वायफाय सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रातील अद्यावत घडामोडी शाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवता येतील.
व्यासपिठावर सरपंच वृषाली कोंडूस्कर,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार,आतिषकुमार देसाई,गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव,शैलेश मुळीक,सचिन मगदूम,चेतन कोटक,प्रशांत देशपांडे ,सागर मुदगल,रविंद्र घोरपडे,प्रदीप लोकरे,संगिता दोरूगडे,आदी उपस्थित होते.
यावेळी आण्णा- भाऊ ग्रूपचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अशोकआण्णा चराटी म्हणाले, राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांनी दुर्गम भागातील शाळातील ई लर्निंग सुविधेसह इतर सुरू केलेले शैक्षणिक उपक्रम आदर्शवत् असे आहेत.त्यांना समाजातील सर्व घटकांनी साथ द्यावी. असे आवाहन केले.
यावेळी सुभाष केसरकर मुख्याध्यापिका लता चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कौतुक तरुणाईच्या विधायक मागणीचे
येथील तरूणांचे विशेष कौतुक करताना श्री घाटगे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी येथील तरूण मला आजरा येथे त्यांना भेटले.त्यावेळी मला वाटले हे तरुण मंडळासाठी डॉल्बी किंवा इतर साहित्य मागतील. मात्र या तरुणाईने त्यांच्याकडे शाळेमध्ये होत असलेली असुविधा दूर करण्यासाठी ई लर्निंग संचची मागणी केली. तरूणाईच्या या विधायक मागणीचा आपण प्राधान्याने विचार करून या दुर्गम भागातील शाळेसाठी पहिल्यांदा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हे तरूण कौतुकास पात्र आहेत.असे प्रशंसोदगार घाटगे यांनी काढले.