सातारा : पाटण तालुक्यात एकाच घरात आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी (दि.21) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई , वडील , भाऊ , बहिण यांचा समावेश आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत.
आनंदा पांडुरंग जाधव (वय-75), सुनंदा आनंदराव जाधव (वय-65), मुलगा संतोष जाधव (वय-45), मुलगी पुष्पा प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत फोन करुनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आनंदा जाधव यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने संबंधितांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील चौघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदा जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. कराड येथे उपचार करुन आल्यानंतर गुरुवारी रात्री घरात सर्वजण एकत्र होते. घरामध्ये ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली होती. गुरुवारी रात्री मुलगी पुष्पा धस यांच्या मुलाने फोन करुन आजोबांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सणबुर मधील घटना घडली ते घर एका आडबाजूला आहे.
या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.