ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गवशी येथील जलजीवन पाणी योजनेच्या चौकशीची मागणी; आत्मदहनाचा इशारा

कळे : अनिल सुतार

केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेच्या गवशी (ता.राधानगरी) येथील कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते धर्मा कांबळे, युवा सेना समन्वय रवींद्र पाटील यांनी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, सीएमओ व पीएमओ कार्यालयाकडे केली आहे.तरी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अन्यथा सहकाऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारीत दिला आहे.

गवशी गावठाणसह पाटीलवाडी, पात्रेवाडी, आंबेवाडी आदी वाड्यावस्त्यांना केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी गतवर्षी पासून सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे.या योजनेनुसार प्रत्येक घरात पाणी जाणार असून प्रतिदिन एका व्यक्तीस ५० लिटर पाणी पुरवण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

मात्र गवशी येथील नळ पाणी योजनेच्या अर्धवट अवस्थेत रखडलेल्या कामाबाबत नागरिकांतून सुरुवातीपासूनच तक्रारी केल्या होत्या. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेता उडवा उडवी केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. सदर योजना मूळ आराखड्यानुसार झाली नसून ठेकेदार आणि अधिकारीवर्गाने संगनमताने जादा काम झाल्याचे दाखवून बिले उचलली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

तर दलित वस्तीत पाईप न बसवता त्याचे बिल ठेकेदारास अदा केले आहे.तसेच रस्ता क्रॉसिंग, मुरूम व खडक खोदणे आदी बाबतीतही गोलमाल झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. योजनेसाठी सरकारने जे मापदंड निश्चित केले आहेत त्याप्रमाणे काम झाले नसल्याचा आरोप करून सदर योजनेची सखोल चौकशी करावी अन्यथा सहकाऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पी एम ओ,सी एम ओ कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

सदर योजना भ्रष्टाचाराचे कुरण..!

सदर योजना ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून ठेकेदार,संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तक्रारीची दखल नघेता संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला आहे.शासनाचे कोट्यावधी रुपये संगनमताने लूटण्याचा हा प्रकार आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी अन्यथा आम्ही सहकार्यासमवेत आत्मदहन करणार आहोत.

– धर्मा कांबळे,रवींद्र पाटील
गवशी ग्रामस्थ.]

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks