सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची १६ ते ३० नोव्हेंबरची एकरकमी एफआरपी रक्कम जमा ; आजखेर साडेतीन लाख टनाचे गाळप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १६ ते ३० नोव्हेंबर या नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीतील तोडणी- वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत.
पत्रकात श्री. घाटगे यांनी म्हटले आहे, नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८९, ४६७ ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिल रक्कम २६ कोटी, ४८ लाख,२२ हजार, ३२० रुपये एवढी होते. त्यापैकी, चार कोटी, १३ लाख, ४३ हजार, २०० रुपये एवढी रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. २२ कोटी, ३४ लाख, ७९ हजार, १२० रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा केली आहे.
कारखान्यांने आजअखेर साडेतीन लाख टन ऊसगाळप करून ३,५१, ६५० साखर पोती उत्पादित झालेली आहेत. सरासरी १०.६१ टक्के साखर उतारा व ११. ५६ टक्के बी हेवी साखर उतारा आहे. सहवीज प्रकल्पामध्ये २, ९८, ३४, ७२० युनिट्स वीज तयार झाली. त्यापैकी,१, ९२, ४६ ५०० युनिट्स वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने या हंगामात एक कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. इथेनॉल प्रकल्पामध्ये १५, ५४, ७६० लिटर्स इथेनॉल निर्मिती व ७, ८२, ५७३ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट असे एकूण २३, ३३, ३३३ लिटर्स इथेनॉल उत्पादित झाले आहे.
गळीत हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यामध्ये मंगळवार दि. १४ डिसेंबरपासून संपर्क साधून ऊस बिलाच्या रकमा व पावत्या घेऊन जाव्यात. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही जनरल मॅनेजर श्री. घाटगे यांनी केले आहे.