ताज्या बातम्या

कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विनाअट राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय : माजी आमदार के. पी. पाटील, २३ मे रोजी राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित

निकाल न्यूज बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके

बिद्री ता. १५  मागील ४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक कार्यकाळात आपण नेहमीच कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीने आपल्याला काही निर्णय घ्यावे लागले. परंतू आता आपल्या कार्यकर्त्यांना स्वास्थ्य देण्यासाठी आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी विनाअट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.
माजी आमदार के. पी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत मुदाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला असून येत्या २३ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
के. पी. पाटील पुढे म्हणाले, १९८५ सालापासून राजकीय जीवनात काम करताना माझ्यासोबत ८० ते ९० हजार लोक नेहमीच सोबत राहिले आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी गावोगावी सहकारी संस्था उभारल्या असून त्या सर्व संस्था सक्षमपणे सुरु आहेत. मी सहकारात काम करणारा सामान्य कार्यकर्ता असून सहकार चळवळ टिकली पाहिजे अशी आपली प्रामाणिक भावना आहे.
ते पुढे म्हणाले, राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्यांचे नेतृत्व मी यापूर्वीही स्विकारले होते. माझे कार्यकर्तेही राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येयधोरणांशी समरस झाले आहेत. मी जरी प्राप्त राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून उमेदवारी घेतली असली तरी माझ्या कार्यकर्त्यांची मानसिकता राष्ट्रवादीतच राहण्याची असल्याने हा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि माझी मैत्री सर्वश्रृत आहे. कितीही राजकीय अडथळा आला तरी आम्ही आमची मैत्री तुटू दिलेली नाही. त्यांच्यासारखे सहकार्य आणि जवळीकता अन्य पक्षात मिळणे शक्य नाही. म्हणूनच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतली असून आपली हसन-किसन ची जोडगोळी यानिमित्ताने पुन्हा एकत्र येत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, माजी सभापती विश्वनाथ कुंभार, प्रा. एच. आर. पाटील, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks