शेकडो महिला बनल्या पैठणीच्या मानकरी; महा महिला बचत गट निधी लिमिटेडचा उपक्रम.

गारगोटी प्रतिनिधी :
महा महिला बचत गट निधी लिमिटेडतर्फे बुधवारी (ता.13) नविन नोंदणी झालेल्या शेकडो सभासदांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते येवला पैठणींचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरगुड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वर्णे, संचालिका विमल पाटील, संचालिका दिपाली भाकरे, व्ही. एम. पाटील, तुकाराम भाकरे, व्यवस्थापकीय संचालक योगेश दिंडे, व्यवस्थापक अंकिता चौगुले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सभासदांचा गौरव करण्यात आला.
प्रदीप वर्णे म्हणाले, महा महिला बचत गट निधी लिमिटेडने तळागाळातील महिलांना सदस्य करण्याची राबविलेली मोहीम कौतुकास्पद आहे. इतर बॅंकांच्या तुलनेत सेवा देण्याची तत्परता वाखाणण्याजोगी आहे. संचालक मंडळाने जनकल्याणाच्या उद्देशाने राबविलेल्या योजना महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या आहेत. यातून महिलांचे नेमकेपणाने सक्षमीकरण होईल, असा विश्वास वाटतो. महिलांचे खऱ्या अर्थाने जर सक्षमीकरण व्हायचे असेल तर महा महिला बचत गट निधी लिमिटेड हाच पर्याय आहे.
योगेश दिंडे म्हणाले, ग्लोबलायझेशनच्या युगात बॅंकिंग क्षेत्रात पारदर्शकपणे काम करणारी संस्था म्हणून महा महिला बचत गट निधी लिमिटेडने कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तृतीय पंथियांना योजनांमध्ये 12 टक्के व्याजदर देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेने प्रयत्न केलेला आहे तो स्तुत्य आहे. जास्तीतजास्त महिलांनी महा महिला बचत गट निधी लिमिटेडचे सभासद होणे गरजेचे आहे.
अंकिता चौगुले म्हणाल्या, प्रत्येक महिलेने जागरुक राहून बचत करणे आवश्यक आहे. बनावट कंपन्या, संस्थांमध्ये गुंतवणूक करणे टाळून अधिकृत कायदेशीर मार्गाच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी. यामुळे फसवणूक टळू शकेल. आज आर्थिक जगतामध्ये काहीजण बनावट कंपन्या उघडून लोकांची फसवणूक करत आहेत. अशा कंपन्या, संस्थांपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. गुंतवणूक किंवा बचत ज्या संस्थांमध्ये तुम्ही करत आहात ती संस्था सरकार दरबारी नोंदणीकृत व कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी आहे काय, याची खातरजमा करणे ही गुंतवणूकदारांचीही जबाबदारी आहे. गुंतवणूक केलेल्या पैशांची पोहोच पावती योग्य तऱ्हेने घ्यावी. महा महिला बचत गट निधी लिमिटेडच्या सभासदांनी संस्थेच्या कल्याणकारक योजनांची माहिती जास्तीतजास्त महिलांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे. एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण घर सक्षम होईल. यातून सामाजिक प्रगतीचा आलेख निश्चितपणे उंचावेल.
सभासद अस्मिता चौगुले यांनी सध्याच्या बॅंकिंग क्षेत्राबाबत प्रश्न विचारले. त्याला संस्थेच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. इतर नूतन सभासदांनीही विचार व्यक्त केले.
प्रकल्प अधिकारी वंदना भोसले, ऐश्वर्या साळुंखे, सोनाली धोंड, दत्ताजीराव पाटील, शुभांगी जाना यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सलोनी खोळांबे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी विकास भोसले, रक्षंदा सुतार यांनी बचत गट निधी लिमिटेडच्या योजनांची माहिती दिली. तसेच सभासदांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पुष्पांजली भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास कडगाव, पाटगाव, बिद्री, मुधाळ तिठ्ठा, कोंडोशी, पुष्पनगर, बोरवडे, तुरंबे या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.