विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी समर्पणाची भावना अंगीकारणे गरजेचे : ह.भ.प.मधुकर भोसले

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उचित ध्येय ठेवून काम केल्यास जगात अशक्य असे काहीच नाही जे प्राप्त होत नाही. असाध्य गोष्टी प्रयत्नाने साध्य करीत गेले तर शक्य सगळेच आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याच्याजवळ असणारे चांगले गुण महत्त्वाचे असतात. स्वतःच्या हितासाठी जो जागत असतो त्याची आई वडील धान्य असतात म्हणून विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी समर्पणाची भावना अंगीकारणे गरजेचे आहे. समर्पणातूनच यशाची बीजे उगवत असतात. समयदान ही शिक्षकांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी कल्याण साठी तो कायमस्वरूपी समय दान देऊन आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो असे प्रतिपादन ह. भ. प .मधुकर भोसले बस्तवडेकर यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एन.एम.एम.एस पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आभार बैठकी प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. पी. पाटील होते.
अध्यक्षिय भाषणात प्राचार्य एस. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला. आजी-माजी विद्यार्थी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रोत्साहनामुळेच मुरगुड विद्यालय प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले. एन. एम .एम. एस विभागात 67 विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक व 95 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक बनवण्याचा मान या शाळेला मिळाला. 67 लाख 98 हजाराची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी मिळवली. कागल तालुक्यात हे विद्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.डी.साठे यांनी केले यावेळी एन .एम. एम. एस विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी वर्षभर राबवलेल्या कार्यक्रमासंदर्भात पालकांना माहिती दिली. धनाजी पाटील, दिपाली माळवदे, राखी शहा, अमर कांबळे, सचिन सुतार, अशोक खराडे ,अशोक लोहार ,शरण्या माळवदे, प्राची कांबळे ,समीक्षा पाटील, नंदकुमार गुरव यांची भाषणे झाली. पालकांच्या वतीने एन एम एम एस मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उप मुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी ,उपप्राचार्य एम.डी खाटांगळे, रणजीत भोसले ,अमृता शिंदे ,राजश्री कांबळे, पी. बी .लोकरे वाय .ई. देशमुख, समीर कटके अशोक चंदनशिवे, संजीवनी भोई, सविता गावडे पालक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार मारुती टिपुगडे यांनी मानले.