सीपीआरमध्ये गर्भवतीचा मृत्यू ; मुलगी अविवाहित असल्याचा आई-वडिलांचा दावा ! मृत कागल तालुक्यातील…

कोल्हापूर प्रतिनिधी :
दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या 25 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे सीपीआरमध्ये मृत्यू झाला. तिला अॅडमिट करणार्या तरुणाने तिचा पती म्हणून नाव नोंदवले. मध्यरात्री तिचा मृत्यू झाल्याचे समजताच तो पसार झाला. दरम्यान, मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने रुग्णालयात आलेल्या तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचा विवाहच झाला नसल्याचा दावा केल्याने पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला.
कागल तालुक्यातील एम. ए. पर्यंत शिक्षण घेतलेली ही तरुणी पुण्यामध्ये नोकरी करीत होती. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याने तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला निपाणी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी तिच्यासोबत पती म्हणून नाव नोंदविलेल्या तरुणाला बोलावले; पण तो पसार झाला होता. यामुळे डॉक्टरांनी याची माहिती मुरगूड पोलिसांना दिली. मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास बडवे पथकासह सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी संबंधित मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलावले.
लग्नच झाले नसल्याचा खुलासा मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय व नातेवाईक सीपीआर रुग्णालयात आले. संबंधित मुलीला दाखल करताना विवाहिता म्हणून पती व अन्य एका महिलेने दाखल केले; पण आपल्या मुलीचा विवाहच झाला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. मुलीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.