मुरगुड : चंद्रकांत माळवदे यांचा शिष्यांनी केला हृद्य सत्कार ; गोवऱ्या व फुले या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ , ती माईक वरची रटाळ भाषणे , ढीगभर हार तुरे , पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो.सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साहित्यिक शिक्षक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता.
प्रेम ,जिव्हाळा ,आदर आणि कृतज्ञता हीच जणू फुले वाटावीत.अत्यंत खडतर आयुष्य वाट्याला येऊन सुध्दा इंग्रजी विषयाचा एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी लोकिक मिळवला.
मध्यंतरीच्या शस्त्रक्रियेमुळे शरीराला आलेली विकलांगता यावर मात करत अध्यात्मिक परिवाराशी एकरूप झालेल्या माळवदे सरनी एक छान पुस्तक लिहिले आहे हे त्या मुलांना समजले.एवढेच नव्हे तर त्या पुस्तकाला राज्यस्तरीय पारितोषिक ही मिळाले आहे हे ऐकून त्यांचे हे विद्यार्थी हरखून गेले.
बातमी मिळताच मुलांनी त्यांचा सत्कार आयोजित केला.मुरगूड मधील सर्व साहित्यप्रेमी ,शिक्षक,पत्रकार, माजी नगरसेवक , अशा सर्व क्षेत्रातील लोकांना निमंत्रित केले .
गोवऱ्या व फुले या त्यांच्या पारितोषिक विजेत्या पुस्तकातील सुखदुःखाच्या प्रसंगावर चर्चा केली.कित्येक दिवस संध्या छायेत लुप्त झालेला हा दीपस्तंभ पुन्हा एकदा पोरांच्या समोर आला. डोळ्यांच्या पापण्या ओलावून जाव्यात असे सरांचे भाषण झाले.पोरांनी ते उरात साठवले. सनई विना संपन्न झालेला सत्काराचा हा सोहळा गुरू शिष्यांच्या मधील मधुर नात्यांच्या तारा छेडून गेला.
सोहळ्याचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी पत्रकार राजू चव्हाण व १९९४ च्या एस एस सी च्या तुकडीचे विद्यार्थी यांनी केले होते.पुढाकार घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची नावे अशी : अमर सणगर,राजू भाट,राहुल वंडकर,सुरेश गोधडे,राजू गोधडे,रविंद्र शिंदे,सचिन गुरव.
ज्येष्ठ नागरिक व लक्ष्मी नारायण संस्थेचे माजी चेअरमन जवाहर शहा, प्रसिद्ध शिल्पकार एम .डी. रावण,दलीत मित्र डी. डी. चौगले व सौ धनश्री चव्हाण यांच्या हस्ते मुलांनी सह पत्नीक सरांचा सत्कार केला.
प्रमुख उपस्थितांत नगर परिषद मुख्याधिकारी संदीप घार्गे, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,पी एस आय पांडुरंग कुडवे,वीजमंडळ अधिकारी हेमंत येडगे,मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तिराळे,शाहू संघ संचालक अनंत फर्नांडीस,मुरगूड विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर पाटील, माजी नगर सेवक धनाजी गोधडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित सुर्यवंशी,प्रकाशक सुभाष धुमे.नगरपरिषद अभियंता प्रकाश पोतदार यांचा समावेश होता. स्वागत राजू चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी तर आभार अमर सणगर यांनी मानले. सूत्र संचालन पत्रकार अनिल पाटील यांनी केले.