जबरदस्तीनं मला ईडी कार्यालयात आणलं ; मलिकांचा कोर्टात दावा

मुंबई ऑनलाईन :
सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं, तिथं गेल्यावर समन्सवर सही घेतली. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही, असं नवाब मलिकांनी कोर्टाला म्हटलं आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती . एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. त्यानंतर आता नवाब मलिकांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे.
सेशन कोर्टामध्ये नवाब मलिक यांनी म्हटलंय की, सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं, तिथं गेल्यावर समन्सवर सही घेतली. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही, असं नवाब मलिकांनी कोर्टाला म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, ईडीने ताब्यात घेण्यापूर्वी कोणतेही समन्स दिलेलं नाहीयं. मला जबरदस्ती नेऊन अटक दाखवली आहे. कोणत्या अधिकाराखाली मला अटक केली गेलीय? असा सवाल नवाब मलिकांकडून करण्यात आला आहे. ईडीने मला समन्स देऊन बोलवायला हवं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
या सुनावणीवेळी नवाब मलिकांची बहिण साईदा खान, तर मुलगी निलोफर मलिक खानदेखील उपस्थित आहेत.