CORONA : ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांच्या कोरोना चाचण्या करू नका; नव्या मार्गदर्शक सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून जारी.

मुंबई :
ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांच्या कोरोना चाचण्या करू नका, धोका नसेल तर त्यांच्या सहवासात आलेल्यांच्याही चाचण्या करू नका, अशा नव्या मार्गदर्शक सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सोमवारी जारी केल्या.
कुणाच्या चाचण्या करू नयेत असे सांगताना आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आयसीएमआरने म्हटले आहे की, सामुदायिक पातळीवर ज्या व्यक्तींना लक्षणे नाहीत त्यांच्या चाचण्या करू नयेत. वयोवृद्ध किंवा इतर आजार नसतील आणि अशी व्यक्ती रुग्ण संपर्कात आलेली असेल आणि लक्षणे नसतील तर अशा व्यक्तीचीही चाचणी केली जाऊ नये. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गृह विलगीकरणात राहिलेल्या रुग्णांच्याही विलगीकरण संपल्यानंतर चाचण्या करण्यात येऊ नयेत. सुधारित धोरणानुसार कोरोना काळजी केंद्रातून उपचार घेऊन, म्हणजेच बरे होऊन बाहेर पडणार्या रुग्णांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येऊ नयेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशांतर्गत आंतरराज्य प्रवास करणार्या प्रवाशांच्याही कोरोना चाचण्या करू नका, असे आयसीएमआरने स्पष्ट म्हटले आहे. आयसीएमआरच्या नव्या धोरणामुळे देशभरातील कोरोना चाचण्यांचे सत्रच आता थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक राज्यांनी धोकादायक किंवा कोरोनाग्रस्त राज्यांतून येणार्या नागरिकांना कोरोना चाचणीची सक्ती केलेली आहे. तीसुद्धा आता करता येणार नाही.